Sia

सिया

Astronomy मध्ये PhD (खरी) असलेल्या एका मित्राचे काल अचानकच ठाण्याला येणे झाले. हक्काचे घर म्हणून राहायला घरी आला.

साहेब मूळचे पुण्याचे पण Wisconsin, USA ला UW-Madison मध्ये काम करतात. एका प्रोजेक्टसाठी सध्या २ वर्षे पुन्हा पुण्यात आले आहेत. आणि फावल्या वेळेत जोरदार ज्योतिष शिकत आहेत.

अस्मादिक थकूनभागून नुकतेच घरी आले होते आणि काही क्षण Europa League पाहता पाहता गाणी ऐकत होते. Sia चे Cheap Thrills जोमात सुरु होते आणि हे तेवढ्यात साहेब आगंतुक प्रगटले.

मित्रांच्या भेटीत होतात तशाच, नेहमीप्रमाणे, रीतसर शिव्या, ओव्या झाल्या. जेवण झाले आणि दोघे पुन्हा Europa League बघत बसलो, पण साहेबांनी गाडी एकदम ज्योतिषाकडे वळवली.

“साल्या, स्टेफीची कुंडली भारी सोडवल्येस. पण एक सांग – प्रसिद्ध लोकांच्या कुंडल्या खरंच सोडवाव्यात का?”

“का सोडवू नयेत?”

“आमचे सर म्हणतात सेलिब्रेटिंचे आयुष्य वेगळे आणि सामान्यांचे आयुष्य वगळे.”

“खरे आहे ते. पण, सेलिब्रेटिंचे त्यांच्या कार्यक्षेत्रातील नाव, पैसा व प्रसिद्धी या गोष्टी सोडल्या तर सामान्यांप्रमाणेच त्यांच्याही आयुष्यात काही घटना घडतात नं?

कुणी डिप्रेशन मध्ये जातं,कुणाला अपघात होतो, कुणाला कॅन्सर होतो. कुणाच्या वडलांना अटक होते. अगदी कार्यक्षेत्रात म्हणायचे तरी कुणी hot भूमिकेने प्रसिद्ध होतं, कुणी ऐतिहासिक भूमिकेने प्रसिद्ध होतं, कुणी romantic भूमिकेने प्रसिद्ध होतं, तर कुणी angry young man म्हणून प्रसिद्ध होतं. हे त्यांच्या त्यांच्या कुंडल्या दाखवतात राव. आपण अशा गोष्टी पडताळू शकलो तर ग्रहयोग उलगडतात. नाही का?”

“हा… ते पण बरोबर आहे रे. पण जन्मवेळ ठाऊक नसेल तर…”

“हे बघ, आपल्यासारखे देश सोड. आपल्या देशात अतिप्रसिद्ध व्यक्तींची ४-४ बर्थ सर्टिफिकेट असतात. पण काही प्रगत देशांत सरकारी authentic records उपलब्ध असतात. अशांच्या कुंडल्या अभ्यासल्या पाहिजेतंच. नुसती जन्मतारीख जरी माहित असेल तरी ग्रहयोग,ग्रहांची नक्षत्रे, नवमांश अशा गोष्टी कळतातंच ना?

साधे पाहा – राहुल द्रविडला लोकांचा अत्यादर का मिळतो, आणि कोहलीचे अग्रेशन का उठून दिसते?

बरं ते जाऊ दे, तू आलास तेव्हा Cheap Thrills सुरु होते, बरोबर?

अडेल, टेलर, सिया यांच्या गाण्यांत त्यांच्या ग्रहयोगांची छाप दिसत नाही असे म्हणशील?

सिया आयुष्यात मोठ्या ups and downs मधून गेली ते तुला ठाऊक आहे. पण तिच्या काही गाण्यांनी मात्र अनेक खचलेल्या लोकांना strength आणि motivation दिले नाही?

मग मला सांग तिचे गुरु, मंगळ रवी असे सकारात्मकतेचे कारक ग्रह (पाहा फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड १) आणि चंद्र पाहायला नकोत? बघायच्ये तिची कुंडली?”

“अर्थात, आणि explain कर.”

[मग आम्ही संग्रहातून ती शोधली. Australian records नुसार तिची जन्मतारीख आणि स्थळ उपलब्ध आहे : December 18, 1975, Adelaide. त्यामुळे माझ्याकडे त्या दिवसाच्या मधल्या वेळेची चंद्रकुंडली आहे.]

“ही बघ. जन्मवेळ थोडी पुढे-मागे झाली तरी चंद्र मंगळाच्या युतीतच राहणार आहे. असा मंगळ वृषभेत मृग नक्षत्रात आहे ! मुळात चंद्र-मंगळ युती माणसाला आशावाद, महत्वाकांक्षा आणि सकारात्मकता चांगली देते.

त्याशिवाय कुंडलीत गुरु हा मीनेचा, बलवान आहे. नुसता मीनेचा नाही, तर तो नेप्च्यूनच्या अंशात्मक नवपंचम योगात आहे.

गुरु मीनेचा असताना रवी पाहिलास? तो धनेत मेष नवमांशात आहे, शिवाय बुधही धनेतच आहे. म्हणजेच चंद्र-मंगळ युती, मीन गुरु, धनु रवी अशी जोरदार ग्रहस्थिती असताना शुक्र तुळेत आहे.

आता तुला बेसिक्स ठाऊक असतील तर ही व्यक्ती इतरांना inspiration आणि motivation देण्याची शक्ती बाळगते हे नाही का कळणार? तेच तिच्या गाण्यांनी केले ना?

आणि सिया तिच्या गाण्यांनी प्रसिद्ध झाली. तुळेत शुक्र-राहू-हर्शल ही phenomenal युती आहे राजा! आणि शुक्र तर स्वाती नक्षत्रात मीन नवमांशात आहे मालक, आहात कुठे? काही काही ग्रह काही काही अंशांवर जबरदस्त फळतात. तुळेत या भागात Alphecca नावाचा एक तारा येतो. तो बुध-शुक्राच्या गुणधर्मांचा असून कला, कलात्मकता यांसाठी फार पोषक आहे. त्याचा orb २ अंश चालतो. सियाचा शुक्र या ताऱ्याच्या १ अंशाने युतीत आहे. या जोडीला चंद्राच्या युतीतील मंगळ वृषभेत मृग नक्षत्रात आहे ! नेप्च्यून – गुरु नवपंचम असताना गुरु रेवती नक्षत्रात आहे. आणि वर धनेचा रवी मेष नवमांश. उमगले?”

“मात्र तिचा प्रियकर दुर्दैवाने अपघात वारला. तिचे दु:ख Healing Is Difficult अल्बममध्ये डोकावते ना?तुळेतील शुक्र-राहू-हर्शल युती आणि त्यांच्या अष्टमातील वक्री मंगळ काय दर्शवतात?

Sexual orientation बद्दल सियाने स्वत:ला flexible म्हटले. तिच्या शब्दांवर (“I’ve always dated boys and girls and anything in between. I don’t care what gender you are, it’s about people.”) तुळेतील शुक्र-राहू-हर्शलचा प्रभाव नाही का?

तिला Graves’ disease झाल्याचे तिने एकदा सांगितले. तुळेतील शुक्र-राहू-हर्शल आणि वृषभेचा मंगळ हे दर्शवत नाही का?

बाकी ती ज्या depression, addiction मधून बाहेर आली त्याची पाळंमुळं इतर ग्रहस्थितीत शोध.

सिया celebrity असली तरी boyfriend च्या मृत्यूचे दु:ख तिलाही झालेच ना? आजार झालाच ना?

ग्रह परिणाम सिलेक्टिव्हली करत नाहीत. Celebrities हे celebrities असतात ते आपल्या दृष्टीने. पण ग्रहांना सामान्य माणूस आणि सेलिब्रेटीज् सर्व सारखेच. सामान्य माणूस आणि सेलिब्रेटीज् यांच्या जीवनात ग्रहस्थितींचे बाह्य एक्स्प्रेशन फक्त बदललेले दिसते. पण सुख-दु:खांची थीम बदलत नाही.

त्यामुळे सामान्य माणसांच्या कुंडल्या तर महत्वाच्या आहेतच यात शंका नाहीच. पण सेलिब्रेटिंच्या कुंडल्या / चंद्रकुंडल्या सुद्धा अभ्यासाव्यात. त्यातून एखादी ग्रहस्थिती जरी उलगडली तरी कारकत्व पक्के होण्यात ते उपयोगी येते.”

(सियाच्या पुढे मार्लन ब्रान्डोची कुंडली पहिली.)

“आता हे पाहा : मार्लन ब्रान्डो ‘गॉडफादर’ शिवाय दुसऱ्या कुठल्या भूमिकेत आठवतो? त्याच्या मीन रवी-चंद्राच्या तृतीयात वृषभेचा शुक्र,षष्ठात सिंहेचा राहू, अष्टमात तुळेचा शनी आणि दशमात धनेचा मंगळ आहे. ते अभ्यासाले नाही तर तो ‘गॉडफादर’ का झाला ते कसे कळेल? मग एखादा aspiring  नट, तुझ्या भाषेत “सामान्य”, असताना तुझ्याकडे कुंडली दाखवायला आला आणि त्याच्या कुंडलीत असे ग्रहयोग असतील तर कुठल्या जॉनर मध्ये त्याला यश मिळेल हे सांगताना तुला अशा अभ्यासाचा उपयोग नाही का होणार?”

मग एक मस्त डायलॉग सुचला – ‘जीवन मोठ्यांचे असो व छोट्यांचे, सुख-दु:खांचे वस्त्र विणणाऱ्या ग्रहस्थितीचे धागेदोरे समानच असतात. जीवनाचे बाह्यांग भिन्न दिसले तरी अंतरंग समान असते.’ पण तो गिळला.

जवळच्या मित्रांपुढे अशी डायलॉगबाजी करता येत नाही 😂!

त्यामुळे भाषणबाजी बंद करून ‘Europa League’ पुन्हा सुरु केले .

कोदंड पुनर्वसु

9820 530 113

Sanj Nimali

पूर

सांज निमाली, ढग भरले रे, अंधाराला पूर.

अशा अवेळी तुझी आठवण, तुझे श्वास पण दूर !

वादळवारा साहवे न मज, कितीक छळसी तूही ?

हाती आहे तुझीच कविता, दूर तुझा पण सूर !

ये ना लवकर, ये ना सखया, इथे व्याकुळे कोणी

आभाळातून घन भरलेले अन् डोळ्यांतून पाणी

धावत ये तू असा अचानक, कवेत घे ऐसे की,

अंगांगातून भिनेल लय अन् श्वासांमधुनी गाणी ll

घर आवरले आहे तेही विस्कटून जाऊ दे,

ओढीला या ओढ भिडूनी पूर पूर होऊ दे,

सर्वस्वाने तुला समर्पित होइन मीही, सखया,

असा बरस की रोमरोम हा चिंब चिंब न्हाऊ दे ll

     – वरदविनायक

Gazal

😆 प्रीतीची गझल 😆

जुनी वही चाळताना अस्मादिकांनी लिहिलेली एक प्रीतीची गझल काल सापडली, आणि मन टुण्णकन् उडी मारून भूतकाळात फिरून आले.

झाले होते असे की अस्मादिक बारावीत असताना अकरावीत एका नवीन सौंदर्याने प्रवेश घेतला होता.

अस्मादिकांसह अनेकाजण भलतीच balance sheet tally करण्यात गुंतले.

अस्मादिक आणि ते सौंदर्य Badminton च्या एकाच टीममध्ये आल्यावर पहिली भेट झाली आणि त्या दिवशी कॉलेजातून घरी परतताना ट्रेनच्या भर गर्दीत ही एकटाकी गझल सुचली !

(त्यावेळेस मोबाईल तर नव्हतेच, फेसबुकचे पूर्वज ऑर्कुट होते. पुरानी यादें…)

काल कागद सापडला आणि ते दिन आठवले.

गेले ते दिन गेले …. 😆😆😆

==========================

प्रीतीची गझल

तुझ्या तहानेने मी व्याकुळ, तुजवर माझे प्रेम सखे

किती करावी तुझी प्रतीक्षा? चकोर अन् मी सेम सखे!

बंदुका नको, नको सुरे अन् नको तुला ती हत्यारे

अचूकशा त्या कटाक्षातुनी करिसी माझा गेम सखे!

अशा कटाक्षाने मी घायळ, मला वाटते नवल असे –

किती हातखंडा तव त्यावर! कधी न चुकसी नेम सखे!

परी न कळते तुला कधी का किती मला तू आवडसी?

रोजच जाशी समोरुनी, पण कधी न पुससी क्षेम सखे?

कॉलेजातील सगळे चवळे सखये तुजवर मरती गं!

होशील का तू माझी आणिक देशील का मज फेम सखे?

ठरवलेय मी तुला घेईनच करून माझी मी नक्की

तुजवर माझी प्रीती म्हणजे ‘ओनरशिप-इन-रेम’ सखे

सुवर्ण, प्लॅटिनम आणिक तो कोहिनूरही झक् मारेल

तू तर त्यांहून चमचमणारा, लखलखणारा जेम सखे

हवी तेधवा ऑर्कुटावर तुला पाहण्या बघ कालच

खर्चून दोन हजार आणिला इंटरनेट मॉडेम सखे

दिसायला मी बरा, तरीही दीन तुझ्यास्तव मी झालो

तरी सख्या तव मज म्हणती बघ ‘सर्किट आईटेम’ सखे

मनाची न, पण लाज जनाची सोडलीय मी तुजसाठी

माझी होण्या प्रेयसी तुला का वाटे मग शेम सखे?

‘हो’ म्हटलिस तरी वेळेआधी सांगू नकोस तव बापा

त्याला कळले तर भिंतीवर बघशील माझी फ्रेम सखे!

– वरदविनायक

My Information

कोदंड पुनर्वसु (श्री. वरदविनायक खांबेटे) यांचा पारंपारिक, के.पी., भाव-नवमांश, व पाश्चात्य ज्योतिष यांचा सखोल अभ्यास आहे. नक्षत्रे, पांचभौतिक सिद्धांत, मानस ज्योतिष व वैद्यक ज्योतिष यांवर त्यांचे विशेष संशोधन आहे. व्यापक संशोधनामुळे ज्योतिर्विद्यावाचस्पती, नक्षत्रज्योतिष अलंकार, ज्योतिष भास्कर, ज्योतिष पंडित, ज्योतिष शास्त्री, मंत्र भास्कर, वास्तु पंडित इ. अनेक पदव्या विविध संस्थांनी त्यांना प्रदान केल्या आहेत.    

त्यांनी गुरुगृही ऋग्वेदीय ब्रह्मकर्माचे शिक्षण घेतले. मानसशास्त्र, खगोलशास्त्र आणि तत्वज्ञानाचाही त्यांचा अभ्यास आहे. ते बी. कॉम्., एल्. एल्. बी., सी. एस्. आहेत. ते हाडाचे शिक्षक असून अनेक वर्षे ज्योतिष शिकवत आहेत.

‘कोदंड पुनर्वसु ज्योतिष अभ्यास’ या युट्युब चॅनेलवर आणि त्यांच्या ‘कोदंड पुनर्वसु’ या फेसबुक पेजवर व्हिडीओज् आणि लेख यांमधून ते अभ्यासकांना ज्योतिष व इतर विषय उलगडणारे महत्वपूर्ण ज्ञान देत असतात. जागतिक पातळीवरील प्रसिद्ध मासिकात त्यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत.

जुन्या-नव्याचा समन्वय साधणे, ज्योतिष संकल्पना सखोल उलगडणे, स्पष्ट व सोपी भाषा, आणि अनुभूतीचा स्पर्श असलेले ज्ञान यांमुळे अभ्यासकांना एक सखोल व आगळा दृष्टिकोन देण्यासाठी ते ओळखले जातात.

ज्योतिषशास्त्रासोबतच, अध्यात्म, धार्मिक ज्ञान, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, खगोलशास्त्र, कविता, भाषा इ. विषयांवरील सरांचे दर्जेदार लेखन अभ्यासकांना आणि रसिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने ही वेबसाईट सुरु करत आहोत. लेखांतील ज्ञान सकस असावे, तुम्हाला त्याचा आयुष्य समृद्ध करण्यासाठी वापर करता यावा, ज्ञानार्थींची ज्ञानभूक शमावी या निकषांचा लेख लिहिताना विचार केला आहे.

आपण रसिक अभ्यासकांनी या लेखांचा आस्वाद घ्यावा आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्यात मदत करावी ही नम्र विनंती.

कोदंड पुनर्वसु

१० जानेवारी २०२३s

सुखाचा कोपरा – रॉजर फेडरर

Roger Federer Astrology & Horoscope

आपल्यापैकी प्रत्येकाचे सुख मिळण्याचे काही कोपरे असतात. ते कायम तसेच टिकावेत अशी आपली भाबडी, प्रापंचिक अपेक्षाही असते. आयुष्याच्या इतर कोपऱ्यांतील जखमा हे असे सुखाचे कोपरे भरून काढत असतात. रॉजर फेडररचा खेळ हा माझ्यासाठी असा एक सुखाचा कोपरा होता. पण नुकतीच त्याने निवृत्तीची घोषणा केली, आणि आपण तंद्रीत असताना एखाद्याने भॉक् करून आपल्याला भानावर आणावे तसे काळाचे भान आले. यापुढे रॉजर टेनिस कोर्टवर दिसणार नाही …. दिसतील त्या – तळ्यातील पाण्यावर उठून विरलेली एखादी रेष आपल्या आठवणीत राहावी तशा – त्याच्या खेळाच्या स्मृती !

भगवंताला ज्या काही गोष्टींसाठी मी thank you म्हणेन त्यांत खेळांच्या बाबतीत या दोन गोष्टी निश्चित असतील : (१) तेंडुलकर, गांगुली, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग यांनी रचलेले महाकाव्य; आणि (२) फेडरर, नदाल व जोकोविक यांनी केलेली सांगीतिका !

एखाद्या उत्तम कवितेने तितकेच उत्तम संगीत व तितकीच उत्तम गायकी ल्यावी आणि आपल्यापुढे ती सर्वांग सुंदर गाण्याच्या रूपात नटून थटून उभी राहावी तसा होता फेडररचा खेळ. फेडररच्या खेळाचे वर्णन एका वाक्यात करायचे झाल्यास – वसंतरावांची धारदार तान घ्यायची, ती कुमारांच्या आध्यात्मिकतेत भिनवायची, तिला लताचा स्वर्गीय सूर जोडायचा आणि त्यात आशाचे लडिवाळ मधाळपण ओतायचे. याने जे तयार होईल तसा होता फेडररचा खेळ ! टेनिस ज्यांना कळते त्यांना ही अतिशयोक्ती वाटणार नाही.

एकीकडे शांत चेहरा तर दुसरीकडे त्या चेहऱ्याला विसंगत असा आक्रमक खेळ; इतरवेळी संयमित, संयत वागणारा, पण कोर्टवर कुठल्याही क्षणी बॅकहॅण्डची जोखीम पत्करणारा; कोर्ट बाहेरच्या खाजगी आयुष्यात लोकांपुढे न येता, मागे राहून आयुष्य जगणारा, तर कोर्टवर विजेच्या चपळाईने नेटच्या जवळ येऊन विलक्षण नजाकतीने खेळ करणारा; दिसायला अगदी साजूक तुपातला, नाजूक, पण लांबलेल्या खेळातही अखेरपर्यंत ढीगभर ऊर्जा अंगी बाळगणार. असे एक आगळेच रसायन फेडररच्या खेळात होते.

आपली पंचाईत ही होते की त्याच्या टेक्निकला शंभर गुण द्यावे तर खेळातील सौंदर्याला दीडशे गुण द्यावे लागतील ! त्याच्या विविध बॅकहँन्ड्स् वर तर कोमल हृदयाच्या अनेक व्यक्ती मेल्याही असतील. त्याचा ट्वीनर, ड्रॉप करतानाची नजाकत, फोरहॅण्ड मधील हस्तलाघव, आणि चेहऱ्यावर उमटणारे मंदस्मित…या साऱ्याच गोष्टींमध्ये सौंदर्य इतके ठासून आहे की या साऱ्याचे एखाद्या स्त्रीमध्ये रूपांतर झाले तर ती मानवी इतिहासातील सर्वात लाघवी स्त्री ठरावी.आणि म्हणूनच, रॉजरच्या खऱ्या चाहत्यांना त्याने किती ग्रँडस्लॅम्स् जिंकलीत याच्याशी काहीही देणे घेणे नव्हते. आकड्यांच्या आणि रेकॉर्डच्या गणितापेक्षा, रॉजरचा कोर्टवर वावर होतो आहे इतकेच त्यांना पुरेसे होते. शेवटी डोळ्यांना मिळणारे सुख आकडे कसे दाखवणार?

मागील काही काळ रॉजर टेनिस कोर्ट पासून दूर होताच, पण तरीही तंदुरुस्त होऊन तो परतेल अशी भाबडी आशा आम्ही अनेक जण बाळगत होतो. पण सुखाचे कोपरे तसेच intact राहावेत ही अपेक्षा चुकीचीच असते. आता, फेडररच्या निवृत्तीनंतर, त्याचा live खेळ पाहता येणार नाही ही वेदना स्वीकारावी लागेल. त्याच्या खेळातून एक विलक्षण कलाकारी आपण पाहू शकलो याचे समाधान मात्र सबंध आयुष्याला पुरेल. Rene Stauffer ने लिहिलेल्या फेडररच्या चरित्रामध्ये त्याचा जन्म तपशील नोंदलेला आहे. या फेडररची कुंडली आपण पाहूया.

८ ऑगस्ट १९८१, सकाळ ८:४० (DST २), बेसेल, स्वित्झर्लंड.

रॉजरचे सिंह लग्न आणि तुळ रास आहे. पुढे मांडलेले योग एकापुढे एक करत अंगीचा खेळ, नजाकत आणि सौंदर्य कसे मल्टिफोल्ड वाढवत नेत आहेत ते पाहुयात
(१) चंद्र तृतीय स्थानी, तोही शुक्राच्या राशीत आणि मिथुन नवमांशात (कला, हस्तकौशल्य, खेळ या दृष्टींनी मोठा पोषक योग).
(२) बुध हा लग्नेश रवीयुक्त, कर्केत, आश्लेषा नक्षत्रात, धनु नवमांशात, चंद्राच्या दशमात वगैरे आहे हेही आपण पाहिले. अर्थात “खेळाच्या दृष्टीने” शनी व बुध दोघेही उत्तमरीत्या स्थित आहेत.
(३) शिवाय इथे ‘शुक्र लग्नीं सिंहेत’ इतकाच योग नसून शुक्र पूर्वा नक्षत्रात, वृश्चिक नवमांशात असल्याने खेळ आणि सौंदर्य कितीतरी पटींनी वाढवणार हे नक्की.
(४) आणि अशा शुक्राचा तुळेच्या चंद्राशी व मिथुनेच्या मंगळाशी अंशात्मक लाभयोग आहे. असे अंशात्मक लाभयोग खेळासाठी फारच पोषक असतात. जोडीला ‘शुक्र-नेपच्यून केंद्रयोग’ आणि ‘लग्नेश रवीची बुधाशी आश्लेषा नक्षत्रात युती व ज्येष्ठा नक्षत्रातील नेपच्यूनशी नवपंचम योग’ नजाकतीत भर घालणारे आहेत.
(५) वरील मुख्य योगांच्या जोडीने – लग्नाचा पंचमेश गुरु हा सप्तमेश शनीच्या युतीत आहे. पंचमेश – सप्तमेश युती कलेसाठी पोषक असते. पंचमेश गुरु हा वृषभ नवमांशात आहे याला खेळाच्या दृष्टीने अतीव महत्व आहे. अशा गुरुवरील मिथुन मंगळाची दृष्टी क्रीडाकौशल्य देते. गंमत म्हणजे लग्न आणि चंद्र या दोन्हींचे पंचमेश (गुरु व शनी) हस्त नक्षत्रात आणि मिथुनेतील मंगळाच्या दृष्टीत आहेत. अंगी खेळाचे बीज उत्तम लाभले नाही तरंच नवल !
(६) चंद्राकडूनही : पंचमेश – सप्तमेश संबंध आहेतच. शिवाय रवी-बुध युती चंदाच्या दशमात आहे. माझ्या मते बुध आश्लेषा नक्षत्रात, धनु नवमांशात असणे हा हस्तलाघव आणि क्रीडाकौशल्य या दृष्टींनी जोरदार योग होतो. दशमेश चंद्र हा तुळेत असताना शुक्राच्या लाभयोगात तर आहेच.

या ठळक योगांसोबत इतरही पोषक योग कुंडलीत आहेतच, फेडररच्या करिअरच्या काळात शनी आणि बुधाच्या महादशा होत्या.

(१) शनी हा पंचमेश गुरुसह हस्त नक्षत्रात वगैरे आहे हे आपण पाहिलेच. मुख्य म्हणजे शनी हा गुरु-मंगळामुळे मोठ्या राजयोगात शिरत आहेत. त्याचा फायदा शनीला कसा झाला हे तुम्हाला “फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम” – खंड ३ अभ्यासून सहज कळेल. (इथे शनी – मंगळ दृष्टियोग वाईट गृहित धरणे चुकीचे आहे. उलट या शनी – मंगळ योगामुळे शनीला राजयोग तर लाभलाच पण शिवाय हा योग गरजेची अशी आक्रमकता अंगीं मिळण्यासाठीही पोषक ठरला!)

(२) बुध हा लग्नेश रवीयुक्त, कर्केत, आश्लेषा नक्षत्रात, धनु नवमांशात, चंद्राच्या दशमात वगैरे आहे हेही आपण पाहिले.

अर्थात “खेळाच्या दृष्टीने” शनी व बुध दोघेही उत्तमरीत्या स्थित आहेत. कोणेशांच्या युतीतील ग्रह (बिघडले नसल्यास) दशेत कसा उकर्ष करतात याचे ही कुंडली उत्तम उदाहरण आहे.

आता हेच शनी-बुध दुसऱ्या बाजूने कसे संबंधित आहेत पाहा – फेडररने नुकतीच निवृत्ती घेतली. त्याला सध्या बुध महादशेत अखेरची शनीची अंतर्दशा सुरु आहे. दशा-अंतर्दशास्वामी बुध आणि शनी हे दोघे मारकेशही आहेत. मारकेश शनी हा अष्टमेश गुरुसह मारक स्थानी असल्याने छिद्रतत्त्व बनतो. सध्या शनी गोचरीने चंद्राच्या कंटक स्थानातून, चंद्राच्या अंशात्मक चतुर्थातून जात आहे. शनी रवीच्याही समोरून जात आहे. राशीतून केतूचे भ्रमण सुरु आहे. शरीराच्या त्रासांपेक्षा मनाने ‘पुरे झाले आता’ वाटत असावे हे दर्शवणारी ही ग्रहस्थिती आहे. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला.

फेडररला कीर्ती-मानसन्मान मिळाले, top position लाभली, त्याने निवृत्ती घेताना प्रतिस्पर्धी आपुलकीने रडले… अशा अनेक गोष्टी दर्शवणाऱ्या ग्रहस्थिती कुठल्या आहेत याचाही अभ्यासकांनी अभ्यास करावा.

Washington Examiner मध्ये मी फेडररबद्दल एक वाक्य वाचले होते – “Love matters in tennis, and no one has it more than Federer.” अशा या लव्हली फेडररला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ. अनंत चाहत्यांना स्वत:च्या खेळाने सुख दिलेल्या या माणसाचे जीवन अधिक सुखाचे जावो ही प्रार्थना करू.

श्रीराम समर्थ.
– कोदंड पुनर्वसु ०६.१०.२०२२
– WhatsApp 9820 530 113

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

Shopping Cart
  • Your cart is empty.