अनाठायी बडबड कमी कशी करू? मौन कसे साधू?
याचे उत्तर देताना खरेतर “मिथुन रास, अटेंशन!”, “चंद्र-बुध युती, अटेंशन” असे म्हणण्याची गरज नाही. उगाच त्या मिथुन राशीला आणि बुधाला नावे ठेवली जातात. पण खरे म्हणजे ग्रहस्थिती काहीही असली तरी आपल्यापैकी बहुतेकांना हा प्रश्न कमी-जास्त प्रमाणात भेडसावत असतोच. अनाठायी बोलण्यात मोठी शक्ती आपण वायफळपणे खर्च करतो हे अनेकांना कळलेले असते. पण प्रयत्न करूनही कमी बोलणे वा व्यक्त होण्याचे रोखता येणे शक्य होत नाही अशी तक्रार असते.
तेव्हा, याबद्दल अनुभवाचे काही शेअर करतो. आचरणात आणता येतील अशा दोन-तीन ट्रिक्स तुम्हाला सांगतो. आयुष्य (चांगल्या अर्थाने) बदलून टाकण्याची क्षमता या ट्रिक्समध्ये आहे.
वायफळ बडबड, अति बोलणे, निष्कारण मते मांडणे या गोष्टी कमी करायची इच्छा ज्या कुणाला आहे, फक्त ‘ते कसे करू’ हा प्रश्न भेडसावतो आहे, त्याने पुढील २ गोष्टी करत राहण्याचा सतत प्रयत्न करावा :
(१) स्वतःच्या अनुभवात जे नाही ते बोलणे टाळायचे. म्हणजे,ज्या गोष्टीचा स्वतःला फर्स्ट हॅन्ड एक्सपिरीयन्स नाही त्या गोष्टीवर व्यक्त होणे टाळायचे.
बऱ्याचदा असे होते की आपण खूप काही वाचतो, ऐकतो, पाहतो, आणि त्यातून आपल्याला बरीच माहिती मिळत जाते. हळूहळू साहजिकच, आपण बऱ्यापैकी ज्ञानी झाल्याचा एक गोड गैरसमजही नकळतपणे मनात रुजू लागतो. मग अशा विषयावर बोलण्याची, व्यक्त होण्याची संधी येताच आपण अगदी हिरीरीने व्यक्त होतो.
पण मनाशीच थोडे पारखून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की वाचण्या-ऐकण्या-पाहण्याने जरी अनेक गोष्टींची ‘माहिती’ आपल्याला होते तरी त्यांतील फारच थोड्या गोष्टींची खरी स्व-अनुभूती आपल्याला असते. फारच क्वचित गोष्टींचा फर्स्ट हॅन्ड एक्सपिरीयन्स आपल्याला असतो. बाकी आपण बाळगलेली इतर बहुतेक माहिती ही ‘दुसऱ्याची’ आपण उचललेली माहिती असते. त्यावर आपल्या शब्दांचे, तर्काचे वेष्टन चढवून त्याबद्दल आपण अगदी सरसावून बोलत असतो. स्वानुभूती नसूनही आपली मते व्यक्त करत असतो. साधे पाहा – उत्सुकता वाढवणारा एखादा गूढ विषय घ्या. कुठला घेऊया बरं? हं. ‘कुंडलिनी’.
आता एक प्रयोग करा. ‘कुंडलिनी’ बद्दल एखाद्या public platform वर किंवा चार जण जमले असताना चर्चा सुरु करा किंवा एखादा प्रश्न विचारा. तुमच्या लक्षात येईल की अनेकजण उत्तरे देण्यास सरसावतील. कुणी चक्रांबद्दल बोलेल,कुणी नाड्यांबद्दल बोलेल, कुणी एखाद्या ग्रंथाचा रेफरन्स देईल. पण बोलतील अनेकजण. आता, बोलणाऱ्यांपैकी किती जण कुंडलिनीशक्तीचा खरोखर यथार्थ अनुभव असल्याने बोलत असतील? जवळजवळ कुणीच नाही. (कारण सांगतो. आपण जर ‘खऱ्या’ योग्यांचे जीवन, आचरण जवळून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की खरा अनुभवी योगी हा निव्वळ अनुभवानेच कळू शकणाऱ्या अशा विषयावर चार अनोळखी जणांसमोर बोलणेच मूळात टाळतो. आणि त्यातही, अनोळखी माणसाने public platform वर विचारलेल्या प्रश्नाला तर तो उत्तरच देत नाही. हे जजमेन्टल होऊन सांगत नाही बरं. अनुभवी योग्यांच्या सहवासात राहिलेल्या कुणालाही हे म्हणणे मान्य होईल यात शंका नाही.)
किंवा, दुसरा विषय घ्या – ज्योतिष. ज्योतिष मुळीच न शिकलेल्या चार जणांत ‘ज्योतिष खरं आहे की खोटं’ अशी चर्चा सुरु करा. ज्योतिष ढिम्म न शिकलेलेही यावर अगदी हिरीरीने मत मांडताना दिसतील.
याचा अर्थ काय? तर, उत्तरे देणारे बहुतेकजण हे कुठेतरी काहीतरी माहिती वाचली, पाहिली, ऐकली असेल, तिच्याच आधारे, स्वत:चे तर्क लावून काहीबाही मत मांडत असतील. त्यामागे वास्तव अनुभव असेलच याची खात्री नाही.
इथे कुंडलिनी किंवा ज्योतिष यांचा उल्लेख हा केवळ उदाहरणादाखल दिला. असे इतरही अनेक विषय आपल्याला केवळ माहिती म्हणून ठाऊक असतात. त्यांचा स्वानुभव मात्र नसतो, किंवा असलाच तर अत्यंत तुरळक अनुभव असतो. मग, ज्या विषयांचा आपल्याला स्वानुभव नसेल त्या विषयांवर बोलणे टाळायचे. थोडक्यात, अनुभव नसताना, केवळ माहिती+तर्क याच्या आधारावर बोलायचे नाही.
पण इथे एक गंमत आहे. आपण हे करायला लागायची खोटी की आपला good old friend – इगो – हा मोठा अडसर बनून मध्ये येणारच! कारण ‘मिरवणे’हे आपल्या अंगवळणी पडलेले असते. लोकेषणा ही मोठी पछाडणारी चीज आहे आणि ती सार्वत्रिक आहे. ‘मला माहित्ये’ हे सांगण्याची इवलीशी संधी इगो सोडत नाही. अशा वेळी मत मांडण्यासाठी आत फटक्याची सुरसुरी लगेच लागते. मनात तडफड चालू होते. सुरुवातीला हे होतेच.
पण तरीही मनाला रोखणे जर जमत राहिले तर व्यक्त होण्याचे ७०% विषय तिथेच गळून पडतात. आपल्याच इगोविरुद्धची ही लढाई जिंकता आली तर ती एक मोठी मजल असते. आता दुसरी गोष्ट.
(२) होताहोईस्तोवर कुणा ‘व्यक्ती’बद्दल बोलणे टाळायचे.
साधारणत: आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल बोलणे आवडते. हे सत्य आहे; उगीच ताकास जाऊन भांडे कशाला लपवायचे? सहसा हे बोलणे उपस्थित नसलेल्या व्यक्तीबद्दलच असते. आई-मुलगी सासूबद्दल बोलतील; दोन कलीग बॉसबद्दल बोलतील, दोन शेजारी तिसऱ्या शेजाऱ्याबद्दल बोलतील, दोन नातलग तिसऱ्या नातलगाबद्दल बोलतील, असे.
दुसऱ्या व्यक्तिबद्दलचे हे बोलणे चांगले असेल तर एक वेळ ठीक. पण आपण नीट न्याहाळले तर लक्षात येईल की सहसा हे बोलणे गॉसिपिंग स्वरूपाचेच असते आणि सहसा ते चांगले नसते. त्यात उणेदुणे काढणे, दूषणे देणे, नावे ठेवणे,टीका करणे हेच प्रकार जास्त असतात. आणि ज्या कुणाबद्दल बोलू त्याबद्दलची ती आपापली ‘मते’ असतात.
मनाशी विचार करा – जिच्याबद्दल चांगले किंवा वाईट मत नाही अशी परिचयातील एकतरी व्यक्ती आहे का? शक्यच नाही! आपल्या नातलगापासून ते व्लादिमिर पुतिनपर्यंत, गल्लीतल्या राम्यापासून ते रामायणातील रावणापर्यंत (तेही रामायण न वाचता) सगळ्यांबद्दल आपली काही मते असतात. पुन्हा प्रामाणिकपणे विचार करा की या सर्व व्यक्तींना आपण आतून, खरेखरे किती ओळखतो? की जे काही असतात ते आपले त्यांबद्दलचे फक्त ‘अंदाज’ असतात? प्रामाणिक विचार केलात तर मन सांगेल – आपली मते हे आपले अंदाजच असतात, जजमेंट्सच असतात. त्यांना वास्तवाची जोड असेलच असे नाही. पण वाईट मत असलेल्या व्यक्तीबद्दल चर्चा निघताच आपणही आपली वाईट मते मांडत सुटतो.
आणि मतांचे ठेवू बाजूला. मत असण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण पुढील वेळी अगदी बारकाईने निरीक्षण करा. चार जण/जणी जमून जेव्हा पाचव्या/पाचवीबद्दल बराच वेळ बोलतात, त्यात कौतुकाचे शब्द किती असतात आणि काहीही असले तरी चर्चेनंतर वेळ वाया जाण्याशिवाय बाकी काय पदरी पडते? तुम्हाला उत्तर ठाऊक आहे.
म्हणून दुसरा उपाय हा की कुठल्याही ‘व्यक्ती’बद्दलच्या चर्चेत आपण मनाने तरी सहभागी व्हायचेच नाही. काढता पाय घेता आला नाही तरी आपणहून संभाषण वाढवायचे नाही; विषय बदलायचा. यायोगे वाईट बोलणे, गॉसिपिंग हे तर थांबतेच, पण निष्कारण दुसऱ्या व्यक्तीच्या दुर्गुणांवर चिंतन करण्याची घोडचूकही बंद होते. हे जमल्यास आपण उरलेली बाजीही मारू शकतो.
या दोन ट्रिक्स जर दैनंदिन जीवनात लक्ष देऊन आचरणात आणता आल्या तर अनाठायी बोलणे हमखास गळून पडेलच. जितके गरजेचे व योग्य असेल तितकेच बोलले जाईल.
हे करण्याचे इतरही अनेक फायदे या गोष्टी आचरणात आणू लागल्यावर लक्षात येतील. उदा. एक फायदा म्हणजे आपला स्वत:चा अहंकार ताब्यात राहणे. होते काय की आपल्यात (अस्मादिकांसकट) अनेक जण असतील ज्यांच्या मनात स्वत:बद्दल एक मोठी इमेज नकळतपणे तयार झालेली असेल. (कटू है, पर सत्य है l). विशेषत:, जनरल नॉलेज चांगले असणाऱ्या माणसांबाबत हे होण्याचा संभव अधिक. ही फुकाची इमेज गळून पडायला वरील गोष्टींनी मदत होते. आजवर माहिती आणि अनुभव यांकडे आपण विशेष लक्ष दिलेले नसते. पण वरील गोष्टींची प्राक्टिस सुरु केल्यावर ‘या विषयाची आपल्याला माहिती असली तरी स्वानुभव नाही’ अशी जाणीव डोळसपणे व्हायला लागते. याने अहंकार आपसूक ताब्यात राहतो.
(यापुढे उपासकांनी अजून एक पायरीसुद्धा आवर्जून चढावी. म्हणजे याला नामस्मरणाची जोड द्यावी. कशासाठी? तर दुसऱ्याबद्दल केवळ वाईट बोलणेच टाळावे असे नाही, तर दुसऱ्याबद्दल वाईट चिंतनही करण्याची मनाची सवय मोडून पडावी यासाठी. निदान तसा प्रयत्न तरी करावा.
आपल्या मनात जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल अनाठायी दुर्विचार यायला लागतात, किंवा आपण एखाद्याचा निष्कारण विचार करत असतो,तेव्हा लक्ष तिथून काढून ते नामावर केंद्रित करावे. ती व्यक्ती तिच्या कर्मभोगानुसार अशी-अशी वागते आहे असे मनास समजावून, तिचे विचार दूर करून नामावर लक्ष द्यावे. अगदी शत्रूबद्दल जरी विचार आले तरी हेच करावे. तुम्ही विचार करून शत्रूत फरक पडणार असतो का? नाही. मग तुम्ही त्याबद्दल विचारांचा कारखाना सुरु करण्याची गरज नाही. तेव्हा, नामावर लक्ष केंद्रित करावे हे उत्तम. यासाठी मात्र बराच सराव लागेल. कारण ते विचार आपलेच असल्याने मन सतत त्यांकडे जाऊ पाहाते. पण हे जमल्यास मनातूनही इतर व्यक्तींचे चिंतन बंद होईल.)
निदान पहिल्या दोन गोष्टी तरी खरोखर जमू लागल्या की कालांतराने आपल्या लक्षात येते की व्यक्त होण्याची खुमखुमी जरा शमली आहे. म्हणजे, व्यक्त होण्याची जी खुमखुमी सुरुवातीला बळाने दाबावी लागत होती (आणि ज्याचा त्रासही होत होता) ती खुमखुमीच शमल्याने तो त्रासही कमी झाला आहे. न बोलण्यातून मिळणाऱ्या शांततेचा हा अनुभव कसा असतो? असा असतो – तुम्ही दमूनभागून घरी आला आहात आणि कोचावर अंग टाकले आहे. तितक्यात कुणीतरी तुम्हाला ‘ती पिशवी जरा मला आणून दे रे/गं’ असे सांगते. तुम्ही कसेनुसे स्वत:ला सावरत उठण्याची तयारी करता तितक्यात ‘नाहीतर राहू दे आत्ता, नंतर आण.’ हे पवित्र शब्द कानी येतात. अशावेळी मनाला ज्या शांततेच्या गुदगुल्या होतात ना, तसा हा अनुभव असतो.
Jokes apart. पण व्यक्त होणे/बोलणे रोखता येणे हे खरोखरच वेगळा अनुभव देते. तेव्हा, ‘मौनीबाबा की जय’ म्हणत सुरुवात तर करू ! “मौना”वर फाsssर बोललो, नाही?
आता, तेरी भी चूप, मेरी भी चूप!
– कोदंड पुनर्वसु