मंत्रजपावरील पोस्टनंतर अशा प्रकारचे काही प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. खरेतर सर्वच संतांनी नामावर भरपूर काही सांगून ठेवले आहे. त्यामुळे माझ्यासारख्या य:कश्चित मनुष्याने त्याबद्दल काही बोलण्याची गरज नाही. प.पू. सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माउलींसारखे करुणाघन सुद्धा हरिपाठात स्पष्ट सांगतात – “नामासी विन्मुख तो नर पापिया” किंवा “ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ” किंवा “रामकृष्ण टाहो नित्य फोडी”. यात सारे काही आले. पण तरीही, उतर म्हणून माझ्या तोंडचे काही न सांगता थेट प.पू. सद्गुरु श्रीरामदासस्वामी महाराज काय सांगतात ते त्यांच्याच शब्दांत पाहू. तेवढे वाचूनही अनेकांना अनेक प्रश्नांची उत्तरे स्पष्टपणे मिळतील.
पुढील ओव्यांतील बोल्ड भागांवर विशेष चिंतन करावे.
स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें ।
नामस्मरणें पावावें । समाधान ॥२॥
नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळीं सायंकाळीं ।
नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥३॥
सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां ।
नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥४॥
हरुषकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं ।
विश्रांतिकाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥५॥
कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट ।
आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥६॥
चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां ।
नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥७॥
संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती ।
नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥८॥
वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां ।
उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥९॥
आधीं आवदसा मग दसा । अथवा दसेउपरी आवदसा ।
प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥१०॥
बाळपणीं तारुण्यकाळीं । कठिणकाळीं वृधाप्यकाळीं ।
सर्वकाळीं अंतकाळीं । नामस्मरण असावें ॥१४॥
नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर ।
माहादोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥२२॥
चहुं वर्णां नामाधिकार । नामीं नाहीं लहानथोर ।
जढ मूढ पैलपार । पावती नामें ॥२४॥
म्हणौन नाम अखंड स्मरावें । रूप मनीं आठवावें ।
तिसरी भक्ती स्वभावें । निरोपिली ॥२५॥
(श्रीदासबोध दशक ४ समास ३ – नामस्मरणभक्ती) या विषयावर याहून अधिक काय बोलावे
? संतांनी सांगितलेले ऐकावे, बास! (टीप : (१) काहींचे गुरु असतील. त्यांनी मात्र त्यांचे गुरु सांगतील त्याप्रमाणे नामजप करावा.(२) नाम मनातल्या मनात घेणे उत्तम. (शास्त्राने खरेतर जपाचे ४ प्रकार सांगितले आहेत.) विशेषत: आपली शुद्धी किंवा स्थलशुद्धी नसेल तेव्हा तर मनातल्या मनातच नाम घ्यावे.
– कोदंड पुनर्वसु.