😆 प्रीतीची गझल 😆
जुनी वही चाळताना अस्मादिकांनी लिहिलेली एक प्रीतीची गझल काल सापडली, आणि मन टुण्णकन् उडी मारून भूतकाळात फिरून आले.
झाले होते असे की अस्मादिक बारावीत असताना अकरावीत एका नवीन सौंदर्याने प्रवेश घेतला होता.
अस्मादिकांसह अनेकाजण भलतीच balance sheet tally करण्यात गुंतले.
अस्मादिक आणि ते सौंदर्य Badminton च्या एकाच टीममध्ये आल्यावर पहिली भेट झाली आणि त्या दिवशी कॉलेजातून घरी परतताना ट्रेनच्या भर गर्दीत ही एकटाकी गझल सुचली !
(त्यावेळेस मोबाईल तर नव्हतेच, फेसबुकचे पूर्वज ऑर्कुट होते. पुरानी यादें…)
काल कागद सापडला आणि ते दिन आठवले.
गेले ते दिन गेले …. 😆😆😆
==========================
प्रीतीची गझल
तुझ्या तहानेने मी व्याकुळ, तुजवर माझे प्रेम सखे
किती करावी तुझी प्रतीक्षा? चकोर अन् मी सेम सखे!
बंदुका नको, नको सुरे अन् नको तुला ती हत्यारे
अचूकशा त्या कटाक्षातुनी करिसी माझा गेम सखे!
अशा कटाक्षाने मी घायळ, मला वाटते नवल असे –
किती हातखंडा तव त्यावर! कधी न चुकसी नेम सखे!
परी न कळते तुला कधी का किती मला तू आवडसी?
रोजच जाशी समोरुनी, पण कधी न पुससी क्षेम सखे?
कॉलेजातील सगळे चवळे सखये तुजवर मरती गं!
होशील का तू माझी आणिक देशील का मज फेम सखे?
ठरवलेय मी तुला घेईनच करून माझी मी नक्की
तुजवर माझी प्रीती म्हणजे ‘ओनरशिप-इन-रेम’ सखे
सुवर्ण, प्लॅटिनम आणिक तो कोहिनूरही झक् मारेल
तू तर त्यांहून चमचमणारा, लखलखणारा जेम सखे
हवी तेधवा ऑर्कुटावर तुला पाहण्या बघ कालच
खर्चून दोन हजार आणिला इंटरनेट मॉडेम सखे
दिसायला मी बरा, तरीही दीन तुझ्यास्तव मी झालो
तरी सख्या तव मज म्हणती बघ ‘सर्किट आईटेम’ सखे
मनाची न, पण लाज जनाची सोडलीय मी तुजसाठी
माझी होण्या प्रेयसी तुला का वाटे मग शेम सखे?
‘हो’ म्हटलिस तरी वेळेआधी सांगू नकोस तव बापा
त्याला कळले तर भिंतीवर बघशील माझी फ्रेम सखे!
– वरदविनायक