पूर
सांज निमाली, ढग भरले रे, अंधाराला पूर.
अशा अवेळी तुझी आठवण, तुझे श्वास पण दूर !
वादळवारा साहवे न मज, कितीक छळसी तूही ?
हाती आहे तुझीच कविता, दूर तुझा पण सूर !
ये ना लवकर, ये ना सखया, इथे व्याकुळे कोणी
आभाळातून घन भरलेले अन् डोळ्यांतून पाणी
धावत ये तू असा अचानक, कवेत घे ऐसे की,
अंगांगातून भिनेल लय अन् श्वासांमधुनी गाणी ll
घर आवरले आहे तेही विस्कटून जाऊ दे,
ओढीला या ओढ भिडूनी पूर पूर होऊ दे,
सर्वस्वाने तुला समर्पित होइन मीही, सखया,
असा बरस की रोमरोम हा चिंब चिंब न्हाऊ दे ll
– वरदविनायक