Astrology Blog

जेन गुडाल – ज्योतिषीय विश्लेषण

मागील आठवड्यात, ३ एप्रिल रोजी, जेन गुडाल यांनी वयाची नव्वदी पार केली. जेन गुडाल कोण? हे ठाऊक नसलेल्यांना एका ओळीत सांगायचे तर जेन यांनी अनेक दशके चिम्पान्झींवर मूलभूत व साहसी संशोधन करून त्यांबद्दल आणि एकंदरीतच निसर्गाबद्दल बरीच माहिती जगापुढे आणली; त्यासाठी आयुष्य वेचले. या महान कार्यासाठी त्यांना जागतिक स्तरावर नावलौकिक मिळाला. अर्थातच हे वर्णन पूरेसे नाही.

साहसी आणि मूलभूत संशोधन कार्यासाठी त्यांना क्योतो मेडल, टेम्पलटन प्राइज्, डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर इ. अनेक मोठे पुरस्कार प्राप्त झाले. जागतिक महायुद्ध, जागतिकीकरण,व्यावसायिकीकरण आणि या साऱ्याचे निसर्गावर होणारे दुष्परिणाम बारकाईने अनुभवलेल्या आणि निसर्ग संवर्धनासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या जेन यांच्याबद्दल ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन शब्द आदराने लिहावेत म्हणून हा प्रपंच.

“जेन गुडाल : द वुमन हू रीडिफाईन्ड मॅन” या पुस्तकात (लेखक : डेल पीटरसन) जेन यांचे जन्म तपशील आहेत. जेनच्या कुंडलीतील ग्रहयोगांचे विश्लेषण पाहू, या.

जेन गुडाल. स्त्री. ३ एप्रिल १९३४, २३:३०, हम्प्स्टीड, इंग्लंड

(कुंडलीचा फोटो सोबत दिला आहे.)

जेन यांच्या कार्यातील मूलभूत गोष्टी म्हणजे प्राण्यांबद्दलची करुणा, भूतदया, निसर्गाबद्दलचे प्रेम, जीवावर बेतू शकेल अशा वातावरणात केलेले साहसी कार्य, नंतर मिळालेले सन्मान आणि नावलौकिक.

यासाठी ज्योतिषीय घटक खालील प्रमाणे असतात :

· जलतत्त्व आणि पृथ्वीतत्त्वही दोन तत्त्वे निसर्ग, जीवसृष्टी दर्शवतात.

· जलतत्त्वाचा चंद्र आणि पृथ्वीतत्त्वाचा बुध हे निसर्गाचे मुख्य कारक ग्रह होतात. चंद्र हा संगोपन करणारा असल्याने सजीवांच्या दृष्टीने विशेष महत्वाचा ठरतो.

· परिणामी कर्क,वृश्चिक, मीन या जलराशी महत्वाच्या ठरतात.

· गुरु हा ग्रह जीवकारक आहे. जीवसृष्टीच्या दृष्टीने गुरु ग्रह आणि त्याच्या धनु,मीन या राशींचा संबंधही विशेष आढळतो. शिवाय, भूतदया, करुणा हेही गुण गुरु देतो; त्याला नेप्च्यूनची जोड लाभते.

· नक्षत्रे, स्थिर तारे यांबद्दल पुढे बोलू.

अशा प्रकारच्या कार्यांसाठी वरील ग्रह आणि राशी महत्वाचे घटक ठरतात. ‘फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम – खंड १’ मध्ये आपण या घटकांचा सविस्तर विचार केला आहेच.

कुठल्याही प्रकारे करुणा लागणाऱ्या, भावना लागणाऱ्या कार्यांसाठी पुष्य, पुनर्वसु, अनुराधा, रेवती यांसारखी काही नक्षत्रे महत्त्वाची ठरतात. याशिवाय,संगोपनाशी निगडीत कामे करणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये चतुर्थस्थानाचा प्रभाव, चतुर्थेशाची बलवत्ता या गोष्टीही महत्वाच्या ठरतात हे आपण फ.सं.अ. – खंड ३ मध्ये पाहिले आहे.

अर्थात, निसर्गाशी, पर्यावरणाशी संबंधित कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये वरील घटकांचा प्रभाव जोरकसपणे आढळून येतो.

जेन यांच्या कुंडलीतील ठळक ग्रहयोग म्हणजे लग्नेश (व राशीस्वामी) मंगळ आणि दशमेश रवी यांची युती पंचम या कोणस्थानी आहे. मंगळ उच्च नवमांशात आहे. हे मंगळ-रवी म्हणजेच लग्नेश-दशमेश, हे गुरुच्या, जलतत्त्वाच्या, मीन या राशीत आहेत. असे असताना या दोघांवर गुरुची दृष्टीसुद्धा आहे. अर्थातच हा महत्वाचा योग आहे कारण लग्नेश-दशमेश असे बलवान असणे हे प्रगतीसाठी आणि मोठ्या कार्यांसाठी उत्तम लक्षण असते.

रवीसोबतचा ग्रह कार्य-कर्म व मानसिकता या दोन्ही दृष्टींनी महत्वाचा ठरतो. इथे तो लग्नेश (मंगळ) आहे. त्यामुळे, व्यक्तीवर जोरदार प्रभाव टाकणारा असा लग्नेश आणि एकंदरीत महत्वाचा असणारा असा रवी हे दोन्ही ग्रह गुरुच्या आणि जलतत्त्वाच्या पूर्ण प्रभावाखाली आहेत.

मंगळ-रवी हे दोन्ही ग्रह अग्नितत्त्वाचे असल्याने ‘संरक्षण’ हा गुण त्यांच्यात मूळातच असतो. त्यातही वृश्चिक लग्नाला जेव्हा ते मीनेत, गुरुदृष्ट असतात तेव्हा कुठल्याही प्रकारच्या संरक्षण, संगोपन, संवर्धनाच्या कार्यासाठी चांगलेच ठरतात. जेन यांच्या कार्यात हे सर्वच आहे.

रवी-मंगळाच्या अशा स्थितीमुळे इथे अग्नी व जल या तत्त्वांचे अतिशय सुंदर मिश्रण झालेले दिसून येते. त्याला गुरुच्या आकाशतत्त्वाचा स्पर्श असल्याने जेन यांचे कार्य उदात्त आणि व्यापक झाले.

हाच भाग चंद्रही अधोरेखित करतो आहे. जेन यांचे लग्न मंगळाच्या जलतत्त्वाच्या वृश्चिक राशीचे आहे. असे असताना लग्नबिंदूजवळ जलतत्त्वाचा चंद्र आहे. इथेही मंगळप्रधान जलतत्त्वाचा प्रभाव दिसून येतो आहे.

वृश्चिकेत सुस्थितीत असणारे ग्रह त्यांच्या मानसगुणांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरतात हा संशोधनाचा मुद्दा आपण फ.सं.अ. – खंड १ मध्ये अभ्यासला. त्यामुळेच, लग्नस्थानातील असा चंद्र व्यक्तीला मातृत्व, संगोपनाची आस फार देतो. याव्यतिरिक्त या चंद्राला भूतदया व करुणा जोडणारा घटक म्हणजे चंद्राचा नेप्च्यूनशी असणारा अंशात्मक केंद्रयोग. मूळातच दशमातील नेप्च्यून अशा कार्यासाठी पोषक असतोच. त्यात हा नेप्च्यून ‘सिंहे’त, दशमात असताना चंद्राच्या केंद्रयोगात असल्याने व्यक्तीत एक कणव निर्माण होते व तिची छाप कार्यावरही पडते.

या कुंडलीत नक्षत्रेही उत्तम प्रकारे मदतीला आली आहेत. उल्लेख तेवढा करायचा तर लग्नेश मंगळ व दशमेश रवी हे रेवती नक्षत्रात आहेत, तर चंद्र व लग्नबिंदू हे अनुराधा नक्षत्रात आहेत. जेन यांच्या कार्यावर,दिसण्यावर या नक्षत्रांची छाप स्पष्ट आहे. या जोडीने या कुंडलीत चतुर्थेश शनी, चतुर्थस्थानी, उच्च नवमांशात आहे. परिणामी चतुर्थस्थान बलवान आहे.

वर उल्लेखलेले ग्रहयोग हे निसर्गप्रेम, भूतदया, संरक्षण-संगोपन-संवर्धनाचे कार्य या गोष्टी दर्शवतात. जेन यांनी हे कार्य चिम्पान्झींच्या माध्यमातून केले.

बाकी, व्ययेश शुक्र हा शनीसह आणि अष्टमेश बुधासह, गृहस्थानी आहे हा योग जंगलात राहणे, रोकड्या निसर्गात वास्तव्य इ. फलिते दर्शवत आहे. जेन यांचा पुनर्विवाह झाला. शुक्र हाच सप्तमेशही आहे आणि वरील प्रकारे शनीशी व अष्टमेश बुधाशी संबंधित आहे. परिणामी, जेन यांचे दोन्ही पती वाईल्डलाईफशीच संबंधित होते.

आता, जेन यांनी जागतिक पातळीवर नाव, सन्मान मिळाले त्याबद्दल.

या कुंडलीत लग्नेश-पंचमेश-दशमेश (मंगळ-गुरु-रवी) यांचा शुभसंबंध एक उत्तम राजयोग घडवत आहे. शनी एक उत्तम शशयोग घडवत आहे (पाहा : फ.सं.अ. – खंड ४). हे योग मोठे कार्य, प्रसिद्धी, सन्मान यांचे द्योतक आहेत. या कुंडलीत मंगळासोबतच रवीची स्थितीही मला विशेष वाटते. (ग्रह बलवान, सुस्थितीत कधी असतो याचे जे नियम फ.सं.अ. खंड ४ मध्ये आपण उलगडले आहेत, ते उत्तम प्रकारे पटवणारा हा रवी आहे.) या कुंडलीत रवी सुस्थानी आहे; मित्रराशीत आहे; इष्ट-मित्र गुरुच्या दृष्टीत आहे; लग्नेश मंगळाच्या युतीत आहे आणि रवीचे नक्षत्रही पोषक आहे. हा रवी दशमेश असताना सर्वबाजूंनी उत्तम स्थितीत आहे. असा रवी माणसाची प्रगती न करेल तरच नवल!

या कुंडलीत काही स्थिर तारे अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत.

दशमेश रवी Alpheratz या स्थिर ताऱ्यावरच आहे. (१९३४ साली हा तारा मीनेत २० अंश २७ कलांवर होता.) हा तारा लोकप्रियता,स्वातंत्र्य, व मान-सन्मान मिळण्यात मोठी मदत करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हिंसेशी (क्रौर्याशी) संबंध असणाऱ्या कामांतील सहभागही हा तारा दर्शवतो. (आता जेन यांचे कार्य हिंसक नसले तरी त्यांचे सगळे कार्य हे जंगलात, संपूर्ण ‘रान’टी वातावरणात, चिम्पान्झींमध्ये, जंगली-हिंसक श्वापदांत राहूनच झाले.) (ज्योतिषात फलिते कसा रंग घेऊ शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. छापेबद्ध फलितांत अडकण्यापासून ज्योतिषाने सावध राहायला लागते हे जे मी वर्गांत शिकवतो, व्याख्यानांत सांगतो ते का ते यावरून लक्षात येईल. इतकेच कशाला? मार्लन ब्रान्डो यांचे चंद्र-रवी Alpheratz वर आहेत. आजही मार्लन ब्रान्डो म्हटले की ‘गॉडफादर’च डोळ्यासमोर येतो.)

आणखी एक स्थिर तारा या कुंडलीत महत्वाचा आहे. Acrab. (१९३४ साली हा तारा वृश्चिकेत ९ अंश १९ कलांवर होता.) जेन यांचा चंद्र Acrab ताऱ्यावर आहे. पाश्चात्य परंपरेने सांगितलेली या ताऱ्याची फळे जेन यांच्याबद्दल अगदी तंतोतंत अनुभवास येताना दिसतात.

चंद्र हा जेन यांचा नवमेश असून तो वृश्चिकेत आहेत. नवमेश चंद्र लग्नी वृश्चिकेत. आधीच हा योग कुठल्याही संशोधन कौशल्यासाठी उत्तम असतो. त्यात, Acrab तारा संशोधनाची चांगली क्षमता देतो असे पाश्चात्य परंपरा सांगतेच. जेन यांच्या थोर संशोधनाच्या कार्याचे प्रत्यंतरच हे योग दर्शवत आहेत.

रवी-चंद्र-मंगळ-तृतीयस्थ राहू यांच्या दशा जेन यांना यादृष्टीने उत्तम गेल्या. पुरस्कार, नाव इ. प्राप्त झाले.

अतिशय बलवान ग्रहस्थिती असणाऱ्या या जेन यांचे कार्यही तितकेच सशक्त आहे. निसर्गापुढे मानवाचेच मोठे आव्हान ठरलेल्या भूमातेला आज अशाच महानुभवांची खरी गरज आहे. असो.

फार क्वचित जनांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये जीवन खऱ्या अर्थाने सत्कारणी लावल्याचे समाधान नांदत असते. जेन यांनी त्यांचे जीवन असे कृतार्थ केले आहे. अशा जेन यांना उत्तम दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो, आणि त्यांकडून प्रेरणा घेऊन या वसुंधरेला सुरक्षित ठेवण्याचे कार्य आपणा सर्वांच्या हातून घडो ही सदिच्छा व्यक्त करून ज्योतिष अभ्यासकांसाठी लिहिलेला हा लेख थांबवतो.

लेख आवडल्यास इतर अभ्यासकांशी आवर्जून शेअर करावा ही विनंती.

श्रीराम समर्थ. शुभं भवतु

– कोदंड पुनर्वसु, १२ एप्रिल २०२४.

सुखाचा कोपरा – रॉजर फेडरर

आपल्यापैकी प्रत्येकाचे सुख मिळण्याचे काही कोपरे असतात. ते कायम तसेच टिकावेत अशी आपली भाबडी, प्रापंचिक अपेक्षाही असते. आयुष्याच्या इतर कोपऱ्यांतील जखमा हे असे सुखाचे कोपरे भरून काढत असतात. रॉजर फेडररचा खेळ हा माझ्यासाठी असा एक सुखाचा कोपरा होता. पण नुकतीच त्याने निवृत्तीची घोषणा केली, आणि आपण तंद्रीत असताना एखाद्याने भॉक् करून आपल्याला भानावर आणावे तसे काळाचे भान आले. यापुढे रॉजर टेनिस कोर्टवर दिसणार नाही …. दिसतील त्या – तळ्यातील पाण्यावर उठून विरलेली एखादी रेष आपल्या आठवणीत राहावी तशा – त्याच्या खेळाच्या स्मृती !

भगवंताला ज्या काही गोष्टींसाठी मी thank you म्हणेन त्यांत खेळांच्या बाबतीत या दोन गोष्टी निश्चित असतील : (१) तेंडुलकर, गांगुली, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग यांनी रचलेले महाकाव्य; आणि (२) फेडरर, नदाल व जोकोविक यांनी केलेली सांगीतिका !

एखाद्या उत्तम कवितेने तितकेच उत्तम संगीत व तितकीच उत्तम गायकी ल्यावी आणि आपल्यापुढे ती सर्वांग सुंदर गाण्याच्या रूपात नटून थटून उभी राहावी तसा होता फेडररचा खेळ. फेडररच्या खेळाचे वर्णन एका वाक्यात करायचे झाल्यास – वसंतरावांची धारदार तान घ्यायची, ती कुमारांच्या आध्यात्मिकतेत भिनवायची, तिला लताचा स्वर्गीय सूर जोडायचा आणि त्यात आशाचे लडिवाळ मधाळपण ओतायचे. याने जे तयार होईल तसा होता फेडररचा खेळ ! टेनिस ज्यांना कळते त्यांना ही अतिशयोक्ती वाटणार नाही.

एकीकडे शांत चेहरा तर दुसरीकडे त्या चेहऱ्याला विसंगत असा आक्रमक खेळ; इतरवेळी संयमित, संयत वागणारा, पण कोर्टवर कुठल्याही क्षणी बॅकहॅण्डची जोखीम पत्करणारा; कोर्ट बाहेरच्या खाजगी आयुष्यात लोकांपुढे न येता, मागे राहून आयुष्य जगणारा, तर कोर्टवर विजेच्या चपळाईने नेटच्या जवळ येऊन विलक्षण नजाकतीने खेळ करणारा; दिसायला अगदी साजूक तुपातला, नाजूक, पण लांबलेल्या खेळातही अखेरपर्यंत ढीगभर ऊर्जा अंगी बाळगणार. असे एक आगळेच रसायन फेडररच्या खेळात होते.

आपली पंचाईत ही होते की त्याच्या टेक्निकला शंभर गुण द्यावे तर खेळातील सौंदर्याला दीडशे गुण द्यावे लागतील ! त्याच्या विविध बॅकहँन्ड्स् वर तर कोमल हृदयाच्या अनेक व्यक्ती मेल्याही असतील. त्याचा ट्वीनर, ड्रॉप करतानाची नजाकत, फोरहॅण्ड मधील हस्तलाघव, आणि चेहऱ्यावर उमटणारे मंदस्मित…या साऱ्याच गोष्टींमध्ये सौंदर्य इतके ठासून आहे की या साऱ्याचे एखाद्या स्त्रीमध्ये रूपांतर झाले तर ती मानवी इतिहासातील सर्वात लाघवी स्त्री ठरावी. आणि म्हणूनच, रॉजरच्या खऱ्या चाहत्यांना त्याने किती ग्रँडस्लॅम्स् जिंकलीत याच्याशी काहीही देणे घेणे नव्हते. आकड्यांच्या आणि रेकॉर्डच्या गणितापेक्षा, रॉजरचा कोर्टवर वावर होतो आहे इतकेच त्यांना पुरेसे होते. शेवटी डोळ्यांना मिळणारे सुख आकडे कसे दाखवणार?

मागील काही काळ रॉजर टेनिस कोर्ट पासून दूर होताच, पण तरीही तंदुरुस्त होऊन तो परतेल अशी भाबडी आशा आम्ही अनेक जण बाळगत होतो. पण सुखाचे कोपरे तसेच intact राहावेत ही अपेक्षा चुकीचीच असते. आता, फेडररच्या निवृत्तीनंतर, त्याचा live खेळ पाहता येणार नाही ही वेदना स्वीकारावी लागेल. त्याच्या खेळातून एक विलक्षण कलाकारी आपण पाहू शकलो याचे समाधान मात्र सबंध आयुष्याला पुरेल.


Rene Stauffer ने लिहिलेल्या फेडररच्या चरित्रामध्ये त्याचा जन्म तपशील नोंदलेला आहे. या फेडररची कुंडली आपण पाहूया.
८ ऑगस्ट १९८१, सकाळ ८:४० (DST २), बेसेल, स्वित्झर्लंड. रॉजरचे सिंह लग्न आणि तुळ रास आहे. पुढे मांडलेले योग एकापुढे एक करत अंगीचा खेळ, नजाकत आणि सौंदर्य कसे मल्टिफोल्ड वाढवत नेत आहेत ते पाहा

(१) चंद्र तृतीय स्थानी, तोही शुक्राच्या राशीत आणि मिथुन नवमांशात (कला, हस्तकौशल्य, खेळ या दृष्टींनी मोठा पोषक योग);
(२) जोडीला, तृतीयेश (व राशीस्वामी) शुक्र लग्नीं असणे हा योग कलागुण दुप्पटीने वाढवतो. त्यात शुक्र सिंहेचा आहे! “फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम” या ग्रंथमालेत खंड २ मध्ये सिंहेचा शुक्र कला/खेळासाठी उत्तम का असतो हे आपण उलगडले आहे.
(३) शिवाय इथे ‘शुक्र लग्नीं सिंहेत’ इतकाच योग नसून शुक्र पूर्वा नक्षत्रात, वृश्चिक नवमांशात असल्याने खेळ आणि सौंदर्य कितीतरी पटींनी वाढवणार हे नक्की.
(४) आणि अशा शुक्राचा तुळेच्या चंद्राशी व मिथुनेच्या मंगळाशी अंशात्मक लाभयोग आहे. असे अंशात्मक लाभयोग खेळासाठी फारच पोषक असतात. जोडीला ‘शुक्र-नेपच्यून केंद्रयोग’ आणि ‘लग्नेश रवीची बुधाशी आश्लेषा नक्षत्रात युती व ज्येष्ठा नक्षत्रातील नेपच्यूनशी नवपंचम योग’ नजाकतीत भर घालणारे आहेत.
(५) वरील मुख्य योगांच्या जोडीने – लग्नाचा पंचमेश गुरु हा सप्तमेश शनीच्या युतीत आहे. पंचमेश – सप्तमेश युती कलेसाठी पोषक असते. पंचमेश गुरु हा वृषभ नवमांशात आहे याला खेळाच्या दृष्टीने अतीव महत्व आहे. अशा गुरुवरील मिथुन मंगळाची दृष्टी क्रीडाकौशल्य देते. गंमत म्हणजे लग्न आणि चंद्र या दोन्हींचे पंचमेश (गुरु व शनी) हस्त नक्षत्रात आणि मिथुनेतील मंगळाच्या दृष्टीत आहेत. अंगी खेळाचे बीज उत्तम लाभले नाही तरंच नवल !
(६) चंद्राकडूनही : पंचमेश – सप्तमेश संबंध आहेतच. शिवाय रवी-बुध युती चंदाच्या दशमात आहे. माझ्या मते बुध आश्लेषा नक्षत्रात, धनु नवमांशात असणे हा हस्तलाघव आणि क्रीडाकौशल्य या दृष्टींनी जोरदार योग होतो. दशमेश चंद्र हा तुळेत असताना शुक्राच्या लाभयोगात तर आहेच. या ठळक योगांसोबत इतरही पोषक योग कुंडलीत आहेतच.

फेडररच्या करिअरच्या काळात शनी आणि बुधाच्या महादशा होत्या.
(१) शनी हा पंचमेश गुरुसह हस्त नक्षत्रात वगैरे आहे हे आपण पाहिलेच. मुख्य म्हणजे शनी हा गुरु-मंगळामुळे मोठ्या राजयोगात शिरत आहेत. त्याचा फायदा शनीला कसा झाला हे तुम्हाला “फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम” – खंड ३ अभ्यासून सहज कळेल. (इथे शनी – मंगळ दृष्टियोग वाईट गृहित धरणे चुकीचे आहे. उलट या शनी – मंगळ योगामुळे शनीला राजयोग तर लाभलाच पण शिवाय हा योग गरजेची अशी आक्रमकता अंगीं मिळण्यासाठीही पोषक ठरला!)

(२) बुध हा लग्नेश रवीयुक्त, कर्केत, आश्लेषा नक्षत्रात, धनु नवमांशात, चंद्राच्या दशमात वगैरे आहे हेही आपण पाहिले. अर्थात “खेळाच्या दृष्टीने” शनी व बुध दोघेही उत्तमरीत्या स्थित आहेत. कोणेशांच्या युतीतील ग्रह (बिघडले नसल्यास) दशेत कसा उकर्ष करतात याचे ही कुंडली उत्तम उदाहरण आहे. आता हेच शनी-बुध दुसऱ्या बाजूने कसे संबंधित आहेत पाहा – फेडररने नुकतीच निवृत्ती घेतली. त्याला सध्या बुध महादशेत अखेरची शनीची अंतर्दशा सुरु आहे.

दशा-अंतर्दशास्वामी बुध आणि शनी हे दोघे मारकेशही आहेत. मारकेश शनी हा
अष्टमेश गुरुसह मारक स्थानी असल्याने छिद्रतत्त्व बनतो. सध्या शनी गोचरीने चंद्राच्या कंटक स्थानातून, चंद्राच्या अंशात्मक चतुर्थातून जात आहे. शनी रवीच्याही समोरून जात आहे. राशीतून केतूचे भ्रमण सुरु आहे. शरीराच्या त्रासांपेक्षा मनाने ‘पुरे झाले आता’ वाटत असावे हे दर्शवणारी ही ग्रहस्थिती आहे. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला. 

फेडररला कीर्ती-मानसन्मान मिळाले, top position लाभली, त्याने निवृत्ती घेताना प्रतिस्पर्धी आपुलकीने रडले… अशा अनेक गोष्टी दर्शवणाऱ्या ग्रहस्थिती कुठल्या आहेत याचाही अभ्यासकांनी अभ्यास करावा. प्रसिद्ध व्यक्तींच्या कुंडल्या सोडवू नयेत असे मुळीच नसते. जन्मतपशील नीट ठाऊक असेल उलट त्या आवर्जून अभासाव्यात. काही बाबतींत त्यांची आणि सामान्य माणसाची lifestyle वेगळी असली तरी ग्रहयोगांचे मूळ बदलत नाही.

असो. Washington Examiner मध्ये मी फेडररबद्दल एक वाक्य वाचले होते –“Love matters in tennis, and no one has it more than Federer.” अशा या लव्हली फेडररला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ. अनंत चाहत्यांना स्वत:च्या खेळाने सुख दिलेल्या या माणसाचे जीवन अधिक सुखाचे जावो ही प्रार्थना करू.

श्रीराम समर्थ.
कोदंड पुनर्वसु ०६.१०.२०२२
WhatsApp 9820 530 113

Shopping Cart
  • Your cart is empty.