आपल्यापैकी प्रत्येकाचे सुख मिळण्याचे काही कोपरे असतात. ते कायम तसेच टिकावेत अशी आपली भाबडी, प्रापंचिक अपेक्षाही असते. आयुष्याच्या इतर कोपऱ्यांतील जखमा हे असे सुखाचे कोपरे भरून काढत असतात. रॉजर फेडररचा खेळ हा माझ्यासाठी असा एक सुखाचा कोपरा होता. पण नुकतीच त्याने निवृत्तीची घोषणा केली, आणि आपण तंद्रीत असताना एखाद्याने भॉक् करून आपल्याला भानावर आणावे तसे काळाचे भान आले. यापुढे रॉजर टेनिस कोर्टवर दिसणार नाही …. दिसतील त्या – तळ्यातील पाण्यावर उठून विरलेली एखादी रेष आपल्या आठवणीत राहावी तशा – त्याच्या खेळाच्या स्मृती !
भगवंताला ज्या काही गोष्टींसाठी मी thank you म्हणेन त्यांत खेळांच्या बाबतीत या दोन गोष्टी निश्चित असतील : (१) तेंडुलकर, गांगुली, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग यांनी रचलेले महाकाव्य; आणि (२) फेडरर, नदाल व जोकोविक यांनी केलेली सांगीतिका !
एखाद्या उत्तम कवितेने तितकेच उत्तम संगीत व तितकीच उत्तम गायकी ल्यावी आणि आपल्यापुढे ती सर्वांग सुंदर गाण्याच्या रूपात नटून थटून उभी राहावी तसा होता फेडररचा खेळ. फेडररच्या खेळाचे वर्णन एका वाक्यात करायचे झाल्यास – वसंतरावांची धारदार तान घ्यायची, ती कुमारांच्या आध्यात्मिकतेत भिनवायची, तिला लताचा स्वर्गीय सूर जोडायचा आणि त्यात आशाचे लडिवाळ मधाळपण ओतायचे. याने जे तयार होईल तसा होता फेडररचा खेळ ! टेनिस ज्यांना कळते त्यांना ही अतिशयोक्ती वाटणार नाही.
एकीकडे शांत चेहरा तर दुसरीकडे त्या चेहऱ्याला विसंगत असा आक्रमक खेळ; इतरवेळी संयमित, संयत वागणारा, पण कोर्टवर कुठल्याही क्षणी बॅकहॅण्डची जोखीम पत्करणारा; कोर्ट बाहेरच्या खाजगी आयुष्यात लोकांपुढे न येता, मागे राहून आयुष्य जगणारा, तर कोर्टवर विजेच्या चपळाईने नेटच्या जवळ येऊन विलक्षण नजाकतीने खेळ करणारा; दिसायला अगदी साजूक तुपातला, नाजूक, पण लांबलेल्या खेळातही अखेरपर्यंत ढीगभर ऊर्जा अंगी बाळगणार. असे एक आगळेच रसायन फेडररच्या खेळात होते.
आपली पंचाईत ही होते की त्याच्या टेक्निकला शंभर गुण द्यावे तर खेळातील सौंदर्याला दीडशे गुण द्यावे लागतील ! त्याच्या विविध बॅकहँन्ड्स् वर तर कोमल हृदयाच्या अनेक व्यक्ती मेल्याही असतील. त्याचा ट्वीनर, ड्रॉप करतानाची नजाकत, फोरहॅण्ड मधील हस्तलाघव, आणि चेहऱ्यावर उमटणारे मंदस्मित…या साऱ्याच गोष्टींमध्ये सौंदर्य इतके ठासून आहे की या साऱ्याचे एखाद्या स्त्रीमध्ये रूपांतर झाले तर ती मानवी इतिहासातील सर्वात लाघवी स्त्री ठरावी. आणि म्हणूनच, रॉजरच्या खऱ्या चाहत्यांना त्याने किती ग्रँडस्लॅम्स् जिंकलीत याच्याशी काहीही देणे घेणे नव्हते. आकड्यांच्या आणि रेकॉर्डच्या गणितापेक्षा, रॉजरचा कोर्टवर वावर होतो आहे इतकेच त्यांना पुरेसे होते. शेवटी डोळ्यांना मिळणारे सुख आकडे कसे दाखवणार?
मागील काही काळ रॉजर टेनिस कोर्ट पासून दूर होताच, पण तरीही तंदुरुस्त होऊन तो परतेल अशी भाबडी आशा आम्ही अनेक जण बाळगत होतो. पण सुखाचे कोपरे तसेच intact राहावेत ही अपेक्षा चुकीचीच असते. आता, फेडररच्या निवृत्तीनंतर, त्याचा live खेळ पाहता येणार नाही ही वेदना स्वीकारावी लागेल. त्याच्या खेळातून एक विलक्षण कलाकारी आपण पाहू शकलो याचे समाधान मात्र सबंध आयुष्याला पुरेल.
Rene Stauffer ने लिहिलेल्या फेडररच्या चरित्रामध्ये त्याचा जन्म तपशील नोंदलेला आहे. या फेडररची कुंडली आपण पाहूया.
८ ऑगस्ट १९८१, सकाळ ८:४० (DST २), बेसेल, स्वित्झर्लंड. रॉजरचे सिंह लग्न आणि तुळ रास आहे. पुढे मांडलेले योग एकापुढे एक करत अंगीचा खेळ, नजाकत आणि सौंदर्य कसे मल्टिफोल्ड वाढवत नेत आहेत ते पाहा
(१) चंद्र तृतीय स्थानी, तोही शुक्राच्या राशीत आणि मिथुन नवमांशात (कला, हस्तकौशल्य, खेळ या दृष्टींनी मोठा पोषक योग);
(२) जोडीला, तृतीयेश (व राशीस्वामी) शुक्र लग्नीं असणे हा योग कलागुण दुप्पटीने वाढवतो. त्यात शुक्र सिंहेचा आहे! “फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम” या ग्रंथमालेत खंड २ मध्ये सिंहेचा शुक्र कला/खेळासाठी उत्तम का असतो हे आपण उलगडले आहे.
(३) शिवाय इथे ‘शुक्र लग्नीं सिंहेत’ इतकाच योग नसून शुक्र पूर्वा नक्षत्रात, वृश्चिक नवमांशात असल्याने खेळ आणि सौंदर्य कितीतरी पटींनी वाढवणार हे नक्की.
(४) आणि अशा शुक्राचा तुळेच्या चंद्राशी व मिथुनेच्या मंगळाशी अंशात्मक लाभयोग आहे. असे अंशात्मक लाभयोग खेळासाठी फारच पोषक असतात. जोडीला ‘शुक्र-नेपच्यून केंद्रयोग’ आणि ‘लग्नेश रवीची बुधाशी आश्लेषा नक्षत्रात युती व ज्येष्ठा नक्षत्रातील नेपच्यूनशी नवपंचम योग’ नजाकतीत भर घालणारे आहेत.
(५) वरील मुख्य योगांच्या जोडीने – लग्नाचा पंचमेश गुरु हा सप्तमेश शनीच्या युतीत आहे. पंचमेश – सप्तमेश युती कलेसाठी पोषक असते. पंचमेश गुरु हा वृषभ नवमांशात आहे याला खेळाच्या दृष्टीने अतीव महत्व आहे. अशा गुरुवरील मिथुन मंगळाची दृष्टी क्रीडाकौशल्य देते. गंमत म्हणजे लग्न आणि चंद्र या दोन्हींचे पंचमेश (गुरु व शनी) हस्त नक्षत्रात आणि मिथुनेतील मंगळाच्या दृष्टीत आहेत. अंगी खेळाचे बीज उत्तम लाभले नाही तरंच नवल !
(६) चंद्राकडूनही : पंचमेश – सप्तमेश संबंध आहेतच. शिवाय रवी-बुध युती चंदाच्या दशमात आहे. माझ्या मते बुध आश्लेषा नक्षत्रात, धनु नवमांशात असणे हा हस्तलाघव आणि क्रीडाकौशल्य या दृष्टींनी जोरदार योग होतो. दशमेश चंद्र हा तुळेत असताना शुक्राच्या लाभयोगात तर आहेच. या ठळक योगांसोबत इतरही पोषक योग कुंडलीत आहेतच.
फेडररच्या करिअरच्या काळात शनी आणि बुधाच्या महादशा होत्या.
(१) शनी हा पंचमेश गुरुसह हस्त नक्षत्रात वगैरे आहे हे आपण पाहिलेच. मुख्य म्हणजे शनी हा गुरु-मंगळामुळे मोठ्या राजयोगात शिरत आहेत. त्याचा फायदा शनीला कसा झाला हे तुम्हाला “फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम” – खंड ३ अभ्यासून सहज कळेल. (इथे शनी – मंगळ दृष्टियोग वाईट गृहित धरणे चुकीचे आहे. उलट या शनी – मंगळ योगामुळे शनीला राजयोग तर लाभलाच पण शिवाय हा योग गरजेची अशी आक्रमकता अंगीं मिळण्यासाठीही पोषक ठरला!)
(२) बुध हा लग्नेश रवीयुक्त, कर्केत, आश्लेषा नक्षत्रात, धनु नवमांशात, चंद्राच्या दशमात वगैरे आहे हेही आपण पाहिले. अर्थात “खेळाच्या दृष्टीने” शनी व बुध दोघेही उत्तमरीत्या स्थित आहेत. कोणेशांच्या युतीतील ग्रह (बिघडले नसल्यास) दशेत कसा उकर्ष करतात याचे ही कुंडली उत्तम उदाहरण आहे. आता हेच शनी-बुध दुसऱ्या बाजूने कसे संबंधित आहेत पाहा – फेडररने नुकतीच निवृत्ती घेतली. त्याला सध्या बुध महादशेत अखेरची शनीची अंतर्दशा सुरु आहे.
दशा-अंतर्दशास्वामी बुध आणि शनी हे दोघे मारकेशही आहेत. मारकेश शनी हा अष्टमेश गुरुसह मारक स्थानी असल्याने छिद्रतत्त्व बनतो. सध्या शनी गोचरीने चंद्राच्या कंटक स्थानातून, चंद्राच्या अंशात्मक चतुर्थातून जात आहे. शनी रवीच्याही समोरून जात आहे. राशीतून केतूचे भ्रमण सुरु आहे. शरीराच्या त्रासांपेक्षा मनाने ‘पुरे झाले आता’ वाटत असावे हे दर्शवणारी ही ग्रहस्थिती आहे. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला.
फेडररला कीर्ती-मानसन्मान मिळाले, top position लाभली, त्याने निवृत्ती घेताना प्रतिस्पर्धी आपुलकीने रडले… अशा अनेक गोष्टी दर्शवणाऱ्या ग्रहस्थिती कुठल्या आहेत याचाही अभ्यासकांनी अभ्यास करावा. प्रसिद्ध व्यक्तींच्या कुंडल्या सोडवू नयेत असे मुळीच नसते. जन्मतपशील नीट ठाऊक असेल उलट त्या आवर्जून अभासाव्यात. काही बाबतींत त्यांची आणि सामान्य माणसाची lifestyle वेगळी असली तरी ग्रहयोगांचे मूळ बदलत नाही.
असो. Washington Examiner मध्ये मी फेडररबद्दल एक वाक्य वाचले होते –“Love matters in tennis, and no one has it more than Federer.” अशा या लव्हली फेडररला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ. अनंत चाहत्यांना स्वत:च्या खेळाने सुख दिलेल्या या माणसाचे जीवन अधिक सुखाचे जावो ही प्रार्थना करू.
श्रीराम समर्थ.
कोदंड पुनर्वसु ०६.१०.२०२२
WhatsApp 9820 530 113