ग्रेस
कधी कधी हे असेच क्षण चिरंतन राहावेत असे वाटते.
एकांती, झाडाच्या बुंध्याला पाठ टेकून बसावे;
हातात ग्रेस असावेत;
आणि समोर आभाळभर पसरलेला सांजरंग….
तोच केशररंग डोळ्यांतून पार रक्तात उतरावा.
मग ग्रेसांची एक एक ओळ घेऊन चित्तडोहामध्ये सखोल बुडून जावे.. खोल…खोल…खोलवर….
=============================
अशाच एका अविट क्षणाची या चित्ताला आस
एकांताला संग द्यावया हातामध्ये ग्रेस
ओळ घेऊनी एक तयाची जावे चित्तीं खोल
मनीं तळाशी उमलून ये दुःखाचे मोहक फूल l
सुई भिजवुनी वेदनेत असल्या दुःखा टोचावी
दुःखाच्या वस्त्रावरची एकेक शिवण उसवावी
करून धागे सर्व मोकळे वाऱ्यावर सोडावे
पाशमुक्तशी अशी नग्नता घेऊन गाणे गावे l
केशररंगी सांज भरे मग रक्तातून विरक्ती
मोहजळाच्या कणाकणातून सुकते बघ आसक्ती
मदिरा भरुनी दुःखाची मग सौख्याच्या पेल्यात
हातामध्ये धरतो माझा कुणी ग्रेस हा हात l