जेन गुडाल – ज्योतिषीय विश्लेषण

मागील आठवड्यात, ३ एप्रिल रोजी, जेन गुडाल यांनी वयाची नव्वदी पार केली. जेन गुडाल कोण? हे ठाऊक नसलेल्यांना एका ओळीत सांगायचे तर जेन यांनी अनेक दशके चिम्पान्झींवर मूलभूत व साहसी संशोधन करून त्यांबद्दल आणि एकंदरीतच निसर्गाबद्दल बरीच माहिती जगापुढे आणली; त्यासाठी आयुष्य वेचले. या महान कार्यासाठी त्यांना जागतिक स्तरावर नावलौकिक मिळाला. अर्थातच हे वर्णन पूरेसे नाही.

साहसी आणि मूलभूत संशोधन कार्यासाठी त्यांना क्योतो मेडल, टेम्पलटन प्राइज्, डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर इ. अनेक मोठे पुरस्कार प्राप्त झाले. जागतिक महायुद्ध, जागतिकीकरण,व्यावसायिकीकरण आणि या साऱ्याचे निसर्गावर होणारे दुष्परिणाम बारकाईने अनुभवलेल्या आणि निसर्ग संवर्धनासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या जेन यांच्याबद्दल ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन शब्द आदराने लिहावेत म्हणून हा प्रपंच.

“जेन गुडाल : द वुमन हू रीडिफाईन्ड मॅन” या पुस्तकात (लेखक : डेल पीटरसन) जेन यांचे जन्म तपशील आहेत. जेनच्या कुंडलीतील ग्रहयोगांचे विश्लेषण पाहू, या.

जेन गुडाल. स्त्री. ३ एप्रिल १९३४, २३:३०, हम्प्स्टीड, इंग्लंड

(कुंडलीचा फोटो सोबत दिला आहे.)

जेन यांच्या कार्यातील मूलभूत गोष्टी म्हणजे प्राण्यांबद्दलची करुणा, भूतदया, निसर्गाबद्दलचे प्रेम, जीवावर बेतू शकेल अशा वातावरणात केलेले साहसी कार्य, नंतर मिळालेले सन्मान आणि नावलौकिक.

यासाठी ज्योतिषीय घटक खालील प्रमाणे असतात :

· जलतत्त्व आणि पृथ्वीतत्त्वही दोन तत्त्वे निसर्ग, जीवसृष्टी दर्शवतात.

· जलतत्त्वाचा चंद्र आणि पृथ्वीतत्त्वाचा बुध हे निसर्गाचे मुख्य कारक ग्रह होतात. चंद्र हा संगोपन करणारा असल्याने सजीवांच्या दृष्टीने विशेष महत्वाचा ठरतो.

· परिणामी कर्क,वृश्चिक, मीन या जलराशी महत्वाच्या ठरतात.

· गुरु हा ग्रह जीवकारक आहे. जीवसृष्टीच्या दृष्टीने गुरु ग्रह आणि त्याच्या धनु,मीन या राशींचा संबंधही विशेष आढळतो. शिवाय, भूतदया, करुणा हेही गुण गुरु देतो; त्याला नेप्च्यूनची जोड लाभते.

· नक्षत्रे, स्थिर तारे यांबद्दल पुढे बोलू.

अशा प्रकारच्या कार्यांसाठी वरील ग्रह आणि राशी महत्वाचे घटक ठरतात. ‘फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम – खंड १’ मध्ये आपण या घटकांचा सविस्तर विचार केला आहेच.

कुठल्याही प्रकारे करुणा लागणाऱ्या, भावना लागणाऱ्या कार्यांसाठी पुष्य, पुनर्वसु, अनुराधा, रेवती यांसारखी काही नक्षत्रे महत्त्वाची ठरतात. याशिवाय,संगोपनाशी निगडीत कामे करणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये चतुर्थस्थानाचा प्रभाव, चतुर्थेशाची बलवत्ता या गोष्टीही महत्वाच्या ठरतात हे आपण फ.सं.अ. – खंड ३ मध्ये पाहिले आहे.

अर्थात, निसर्गाशी, पर्यावरणाशी संबंधित कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये वरील घटकांचा प्रभाव जोरकसपणे आढळून येतो.

जेन यांच्या कुंडलीतील ठळक ग्रहयोग म्हणजे लग्नेश (व राशीस्वामी) मंगळ आणि दशमेश रवी यांची युती पंचम या कोणस्थानी आहे. मंगळ उच्च नवमांशात आहे. हे मंगळ-रवी म्हणजेच लग्नेश-दशमेश, हे गुरुच्या, जलतत्त्वाच्या, मीन या राशीत आहेत. असे असताना या दोघांवर गुरुची दृष्टीसुद्धा आहे. अर्थातच हा महत्वाचा योग आहे कारण लग्नेश-दशमेश असे बलवान असणे हे प्रगतीसाठी आणि मोठ्या कार्यांसाठी उत्तम लक्षण असते.

रवीसोबतचा ग्रह कार्य-कर्म व मानसिकता या दोन्ही दृष्टींनी महत्वाचा ठरतो. इथे तो लग्नेश (मंगळ) आहे. त्यामुळे, व्यक्तीवर जोरदार प्रभाव टाकणारा असा लग्नेश आणि एकंदरीत महत्वाचा असणारा असा रवी हे दोन्ही ग्रह गुरुच्या आणि जलतत्त्वाच्या पूर्ण प्रभावाखाली आहेत.

मंगळ-रवी हे दोन्ही ग्रह अग्नितत्त्वाचे असल्याने ‘संरक्षण’ हा गुण त्यांच्यात मूळातच असतो. त्यातही वृश्चिक लग्नाला जेव्हा ते मीनेत, गुरुदृष्ट असतात तेव्हा कुठल्याही प्रकारच्या संरक्षण, संगोपन, संवर्धनाच्या कार्यासाठी चांगलेच ठरतात. जेन यांच्या कार्यात हे सर्वच आहे.

रवी-मंगळाच्या अशा स्थितीमुळे इथे अग्नी व जल या तत्त्वांचे अतिशय सुंदर मिश्रण झालेले दिसून येते. त्याला गुरुच्या आकाशतत्त्वाचा स्पर्श असल्याने जेन यांचे कार्य उदात्त आणि व्यापक झाले.

हाच भाग चंद्रही अधोरेखित करतो आहे. जेन यांचे लग्न मंगळाच्या जलतत्त्वाच्या वृश्चिक राशीचे आहे. असे असताना लग्नबिंदूजवळ जलतत्त्वाचा चंद्र आहे. इथेही मंगळप्रधान जलतत्त्वाचा प्रभाव दिसून येतो आहे.

वृश्चिकेत सुस्थितीत असणारे ग्रह त्यांच्या मानसगुणांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरतात हा संशोधनाचा मुद्दा आपण फ.सं.अ. – खंड १ मध्ये अभ्यासला. त्यामुळेच, लग्नस्थानातील असा चंद्र व्यक्तीला मातृत्व, संगोपनाची आस फार देतो. याव्यतिरिक्त या चंद्राला भूतदया व करुणा जोडणारा घटक म्हणजे चंद्राचा नेप्च्यूनशी असणारा अंशात्मक केंद्रयोग. मूळातच दशमातील नेप्च्यून अशा कार्यासाठी पोषक असतोच. त्यात हा नेप्च्यून ‘सिंहे’त, दशमात असताना चंद्राच्या केंद्रयोगात असल्याने व्यक्तीत एक कणव निर्माण होते व तिची छाप कार्यावरही पडते.

या कुंडलीत नक्षत्रेही उत्तम प्रकारे मदतीला आली आहेत. उल्लेख तेवढा करायचा तर लग्नेश मंगळ व दशमेश रवी हे रेवती नक्षत्रात आहेत, तर चंद्र व लग्नबिंदू हे अनुराधा नक्षत्रात आहेत. जेन यांच्या कार्यावर,दिसण्यावर या नक्षत्रांची छाप स्पष्ट आहे. या जोडीने या कुंडलीत चतुर्थेश शनी, चतुर्थस्थानी, उच्च नवमांशात आहे. परिणामी चतुर्थस्थान बलवान आहे.

वर उल्लेखलेले ग्रहयोग हे निसर्गप्रेम, भूतदया, संरक्षण-संगोपन-संवर्धनाचे कार्य या गोष्टी दर्शवतात. जेन यांनी हे कार्य चिम्पान्झींच्या माध्यमातून केले.

बाकी, व्ययेश शुक्र हा शनीसह आणि अष्टमेश बुधासह, गृहस्थानी आहे हा योग जंगलात राहणे, रोकड्या निसर्गात वास्तव्य इ. फलिते दर्शवत आहे. जेन यांचा पुनर्विवाह झाला. शुक्र हाच सप्तमेशही आहे आणि वरील प्रकारे शनीशी व अष्टमेश बुधाशी संबंधित आहे. परिणामी, जेन यांचे दोन्ही पती वाईल्डलाईफशीच संबंधित होते.

आता, जेन यांनी जागतिक पातळीवर नाव, सन्मान मिळाले त्याबद्दल.

या कुंडलीत लग्नेश-पंचमेश-दशमेश (मंगळ-गुरु-रवी) यांचा शुभसंबंध एक उत्तम राजयोग घडवत आहे. शनी एक उत्तम शशयोग घडवत आहे (पाहा : फ.सं.अ. – खंड ४). हे योग मोठे कार्य, प्रसिद्धी, सन्मान यांचे द्योतक आहेत. या कुंडलीत मंगळासोबतच रवीची स्थितीही मला विशेष वाटते. (ग्रह बलवान, सुस्थितीत कधी असतो याचे जे नियम फ.सं.अ. खंड ४ मध्ये आपण उलगडले आहेत, ते उत्तम प्रकारे पटवणारा हा रवी आहे.) या कुंडलीत रवी सुस्थानी आहे; मित्रराशीत आहे; इष्ट-मित्र गुरुच्या दृष्टीत आहे; लग्नेश मंगळाच्या युतीत आहे आणि रवीचे नक्षत्रही पोषक आहे. हा रवी दशमेश असताना सर्वबाजूंनी उत्तम स्थितीत आहे. असा रवी माणसाची प्रगती न करेल तरच नवल!

या कुंडलीत काही स्थिर तारे अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत.

दशमेश रवी Alpheratz या स्थिर ताऱ्यावरच आहे. (१९३४ साली हा तारा मीनेत २० अंश २७ कलांवर होता.) हा तारा लोकप्रियता,स्वातंत्र्य, व मान-सन्मान मिळण्यात मोठी मदत करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हिंसेशी (क्रौर्याशी) संबंध असणाऱ्या कामांतील सहभागही हा तारा दर्शवतो. (आता जेन यांचे कार्य हिंसक नसले तरी त्यांचे सगळे कार्य हे जंगलात, संपूर्ण ‘रान’टी वातावरणात, चिम्पान्झींमध्ये, जंगली-हिंसक श्वापदांत राहूनच झाले.) (ज्योतिषात फलिते कसा रंग घेऊ शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. छापेबद्ध फलितांत अडकण्यापासून ज्योतिषाने सावध राहायला लागते हे जे मी वर्गांत शिकवतो, व्याख्यानांत सांगतो ते का ते यावरून लक्षात येईल. इतकेच कशाला? मार्लन ब्रान्डो यांचे चंद्र-रवी Alpheratz वर आहेत. आजही मार्लन ब्रान्डो म्हटले की ‘गॉडफादर’च डोळ्यासमोर येतो.)

आणखी एक स्थिर तारा या कुंडलीत महत्वाचा आहे. Acrab. (१९३४ साली हा तारा वृश्चिकेत ९ अंश १९ कलांवर होता.) जेन यांचा चंद्र Acrab ताऱ्यावर आहे. पाश्चात्य परंपरेने सांगितलेली या ताऱ्याची फळे जेन यांच्याबद्दल अगदी तंतोतंत अनुभवास येताना दिसतात.

चंद्र हा जेन यांचा नवमेश असून तो वृश्चिकेत आहेत. नवमेश चंद्र लग्नी वृश्चिकेत. आधीच हा योग कुठल्याही संशोधन कौशल्यासाठी उत्तम असतो. त्यात, Acrab तारा संशोधनाची चांगली क्षमता देतो असे पाश्चात्य परंपरा सांगतेच. जेन यांच्या थोर संशोधनाच्या कार्याचे प्रत्यंतरच हे योग दर्शवत आहेत.

रवी-चंद्र-मंगळ-तृतीयस्थ राहू यांच्या दशा जेन यांना यादृष्टीने उत्तम गेल्या. पुरस्कार, नाव इ. प्राप्त झाले.

अतिशय बलवान ग्रहस्थिती असणाऱ्या या जेन यांचे कार्यही तितकेच सशक्त आहे. निसर्गापुढे मानवाचेच मोठे आव्हान ठरलेल्या भूमातेला आज अशाच महानुभवांची खरी गरज आहे. असो.

फार क्वचित जनांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये जीवन खऱ्या अर्थाने सत्कारणी लावल्याचे समाधान नांदत असते. जेन यांनी त्यांचे जीवन असे कृतार्थ केले आहे. अशा जेन यांना उत्तम दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो, आणि त्यांकडून प्रेरणा घेऊन या वसुंधरेला सुरक्षित ठेवण्याचे कार्य आपणा सर्वांच्या हातून घडो ही सदिच्छा व्यक्त करून ज्योतिष अभ्यासकांसाठी लिहिलेला हा लेख थांबवतो.

लेख आवडल्यास इतर अभ्यासकांशी आवर्जून शेअर करावा ही विनंती.

श्रीराम समर्थ. शुभं भवतु

– कोदंड पुनर्वसु, १२ एप्रिल २०२४.

Leave a Comment

Your email address will not be published.

Shopping Cart
  • Your cart is empty.